जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित पावती एजंट अनिल रमेशचंद पगारीया याला मुंबई हायकोर्टाने आज दिलासा दिला आहे. त्यानुसार पगारीयाला २४ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बीएचआर घोटाळ्यातील पावती एजंट अनिल रमेशचंद पगारीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बीएचआर घोटाळ्याचे तीन गुन्हे पुण्यातील डेक्कन, शिक्रापुर व आळंदी पाेलिस ठाण्यात दाखल आहेत. यातील डेक्कन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ रोजी दोषारोपपत्र सादर केले. याच गुन्ह्यात अनिल पगारीया याने अटकपुर्व जामीन मागीतला होता. त्यावर पुणे न्यायाधिश एस. एस. गोसावी यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यांनतर पगारियाने मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने २४ मार्चपर्यंत ३० हजाराच्या वयैक्तिक जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे देखील दिले आहेत. दरम्यान, आज कोर्टात सकाळ व दुपारच्या सत्रात सरकारी वकील उपस्थित राहू न शकल्यामुळे पुढील तारीख मागण्यात आली. त्यावर कोर्टाने पुढील तारीख देत पगारीयाला देखील पुढील तारखेपर्यंत अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला.
दुसरीकडे पगारिया यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी रमेशचंद पगारीया या नावाच्या साम्यामुळे पावती एजंट समजून अनिल रमेशचंद पगारीया यांच्यावर गुन्हा दाखल केला. वास्तविक अनिल पगारिया यांचा व त्यांचे शेतकरी वडील रमेशचंद पगारीया यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. ते या पतसंस्थेचे साधे सदस्य देखील नाहीत.
दरम्यान, अनिल पगारीया याने जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, महावीर जैन, विवेक ठाकरे यांच्यासोबत संगनमत करुन अनेक ठेवीदारांची दिशाभुल केली. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करुन देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. ३० टक्के रक्कम ठेऊन घेत ठेवीदारांना ठेवीतील ७० टक्के पैसे परत करण्याचे काम त्याने केले आहे. त्यामुळे बीएचआरसह ठेवीदारांचे नुकसान झाले. तर कर्जदारांना बेकायदेशीरपणे लाभ मिळवुन दिला आहे, असा युक्तीवाद पुणे कोर्टात सरकारी वकील प्रवीण चव्हाण व त्रयस्त अर्जदार अॅड. अक्षता नायक यांनी केला होता.