जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित उद्योजक सुनील झंवर यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रातून त्याने नाशिक मधील विविध कामांचे ठेक्यांसह अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे का?, याचा तपास पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याच्या वृत्ताने नाशिकमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बीएचआर घोटाळ्याचा पैसा झंवर यांनी बोरा नामक व्यक्तीच्या माध्यमातून नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये गुंतवल्याचा संशय पोलिसांना असून लवकरच पथकाकडून नाशिक महापालिकेतील साडेतीन वर्षातील कंत्राटांची तपासणी होणार असल्याचेही कळते.
बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात मिळालेल्या कामगारांच्या एटीएम कार्डसह अन्य काही कागदपत्र सापडली होती. या कागदपत्रांचा संबंध नाशिक महापालिकेतील वादग्रस्त सफाई कर्मचारी ठेक्यासोबत असल्याचा यंत्रणेला संशय आहे. एवढेच नव्हे तर शालेय पोषण आहार, आऊटसोर्सिंगद्वारे शहर स्वच्छता स्मार्ट सिटीमार्फत सुरू असलेले प्रोजेक्ट, गोदा गोदावरी नदीवर सुरू असलेले पुलाचे काम तसेच समृद्धी महामार्गाच्या कामासाठी बोरा नावाच्या व्यक्तीने पुरवलेले डंपर जेसीबी अशा कामांची कामांशी जवळ यांचा काही संबंध आहे का? याची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक लवकरच नाशिकमध्ये पोहोचणार असल्याचे कळते. त्यामुळे पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचा आपला मोर्चा नाशिककडे वळविल्याचे चित्र आहे. दरम्यान, सुनील झंवर यांची मागील काही वर्षात झालेली आर्थिक प्रगती पाहून पोलीस देखील चक्रावले असून राज्यात कुठं-कुठं त्यांनी गुंतवणूक केली आहे, याची चौकशी होणार आहे. तसेच ही गुंतवणूक ‘बीएचआर’ घोटाळ्याच्या पैशातून झाली आहे का?, याची प्रामुख्याने चौकशी होणार असल्याचे कळते.
नाशिकमधील धान्य व्यापारी व महापालिकेतील ठेकेदार बोरा या दोघांच्या माध्यमातून नाशिकमध्ये औद्योगिक वसाहती बरोबरच इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, दरी, मातोरी आदी भागात अनेक मोठ्या फार्महाउसचे व्यवहार झाल्याच्या तक्रारी तपास यंत्रणेला मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. ‘बीएचआर’च्या घोटाळ्याचे धागेदोरे नाशिक येथील वॉटर ग्रीसचा ठेका, मांजरपाडा आणि समृद्धी योजनेतील वाहन पुरवठ्याचा ठेक्याच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे. तसेच नशिकमधील सातपूर-अंबडमध्ये अनेक बेनामी संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आपल्या तापसाचा मोर्चा आता नाशिकच्या दिशेने वळविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.