जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तथा अवसायक जितेंद्र कंडारेला सोमवार दुपारपासून जळगावात आणून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशीला सुरुवात केली आहे. यावेळी पोलिस पथक जळगावातील मुख्य शाखेतील महत्वपूर्ण विविध कागदपत्रांची माहिती कंडारेकडून जाणून घेत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे दोन अधिकारी पाच कर्मचाऱ्यांचे पथक जळगावात ठाण मांडून असून पुढील काही दिवस ही चौकशी सुरु राहणार असल्याचे कळते.
आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारेला सोमवारी जळगावात आणत कसून चौकशी केली. यावेळी पोलिसांनी विविध कागदपत्रांसह जळगावातील मुख्य शाखेतील महत्वपूर्ण माहिती कंडारेकडून जाणून घेतली. आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अंदाजे ६५० कर्जखाती एफ.डी. मॅचिंगद्वारे निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु यापैकी बऱ्याच कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज फाईल व एफ.डी. मॅचिंग झालेल्या फाईल्स कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेल्या नाहीत. या सर्व फाईल्स पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असून त्या कोठे दडवून ठेवल्या आहेत, याबाबत कंडारेकडे जळगावात आणून विचारपूस केली जात आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सोमवार दुपारपासून जळगावात पोहचले असून कंडारेला मुख्य शाखेसह त्याच्या घरी देखील नेऊन चौकशी केली जात आहे. कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे ७ महिने फरार होता. या कालावधीमध्ये तो दिल्ली, गुजरात व मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कंडारेला अटक केली तेव्हा त्याच्या ताब्यात पतसंस्थेचा बॅकअप डेटा असलेल्या ३ हार्डडिस्क ४ मोबाईल हॅन्डसेट व पतसंस्थेशी संबंधित काही कागदपत्रे मिळुन आलेली आहेत. प्रत्यक्षात सदरची माहिती पतसंस्थेतच असणे आवश्यक होती. त्यामुळे त्याच्या फरारच्या कालावधीमध्ये त्याने पतसंस्थेतील अधिक दस्तऐवज, हार्डडिस्क वगैरे पुरावा अन्यत्र कोणाकडे लपवून ठेवला असण्याची किंवा नष्ट केला असण्याची दाट शक्यता आहे. याबाबत देखील कांडारेची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आणखी काही दिवस जळगावात ठाण मांडून थांबणार असल्याचे कळते.