जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेले अनेक आरोपी कर्जाची रक्कम रीतसर भरायला तयार असल्याची माहिती समोर येत आहे. यातील काही आरोपी उद्या-परवा न्यायालयात याबाबतचे प्रतिज्ञा पत्र सादर करणार असल्याचेही कळते. दरम्यान, असे झाल्यास ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याच्या आशा वाढणार असून आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे मोठे यश राहील.
बीएचआर घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच ११ संशयिताना ताब्यात घेतले होते. त्यात अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) यांचा समावेश होता. यातील ९ जणांनी पुणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. त्यावर आता १ जुलै रोजी कामकाज होणार आहे.
तत्पूर्वी एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. त्यानुसार अनेक आरोपी कर्जाची रक्कम रीतसर भरायला तयार असून उद्या-परवा न्यायालयात याबाबतचे प्रतिज्ञा पत्र सादर करणार असल्याचेही कळते. दरम्यान, यामुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची आशा वाढली आहे. कायद्याचे अज्ञान किंवा आमचा उद्देश बँक बुडवण्याचा नव्हता. त्यामुळे आमच्याकडे नियमाप्रमाणे वसुलीस पात्र असणारी रक्कम भरण्यास तयार असल्याचे अनेक जण तयार आहेत. दरम्यान, यंत्रणा देखील याबाबत सौम्य भूमिका घेऊ शकते. दरम्यान, अटकेतील संशयितांनी कोट्यावधींच्या पावत्या मॅचिंग केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले होते. त्यामुळे संशयित पैसे भरायला तयार झाल्यास त्यांना जामीन मंजूर होण्याची शक्यता वाढून जाईल. तसेच ठेवीदारांना आपल्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे परत मिळू शकतील. पावत्या मॅचिंग करून किंवा इतर प्रकारे बीएचआरला पोखरणाऱ्यांची संख्या साधारण ६५१ च्या घरात आहे. तूर्त आर्थिक गुन्हे शाखेने ज्यांच्याकडे एक कोटीहून अधिकची रक्कम वसुलीस पात्र आहे, अशा टॉप २० लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे. यानंतर उर्वरित संशयित रडारवर येणार आहे. त्यामुळे भविष्यात पैसे बँकेत भरणाऱ्यांची संख्या वाढू शकते.
विजय वाघमारे (९२८४०५८६८३)