जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारेने १०० कोटीहून अधिक पावत्यांची मॅचिंग केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर कंडारेकडून ३ हार्ड डिक्स आणि अनेक महत्वपूर्ण कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, सरकार पक्षाने आज कंडारेला पोलीस कोठडी मिळावी म्हणून तब्बल १९ कारणे न्यायालयाला सांगितली.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारेने आज पुणे न्यायालयात हजर केले असता त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षाने आज कंडारेची पोलीस कोठडी मिळावी म्हणून १९ कारणे न्यायालयाला सांगितली. त्यामध्ये प्रामुख्याने कंडारे हा सराईत गुन्हेगारा प्रमाणे वेषांतर करून दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी थांबून पोलिसांना चकवा देत होता. कंडारेची अवसायक म्हणून नियुक्ती झालेली नव्हती. त्याआधीच्या काही नोंदी सुनील झंवरच्या कार्यालयातून जप्त केलेल्या संगणकातून समोर आल्या आहेत. याचाच अर्थ कंडारेची नियुक्ती ही ठरवून करण्यात आली आणि त्यानंतर सर्व घोटाळा संगनमताने करण्यात आला.
कंडारे हा शासकीय कर्मचारी असून देखील त्याने बीएचआरच्या वेबसाईटचा अक्सेस सुनील आणि सुरज झंवरला दिलेला होता. त्यामुळे कंडारेने आणखी इतर कुणाला असा अक्सेस दिला होता का?. बीएचआरच्या वेबसाईटचा सोर्स कोड कुणाल शहा मार्फत कुणाला दिला?. याचा देखील तपास पोलिसांना करायचा आहे. कंडारे प्रत्येकाकडून ३० टक्क्याप्रमाणे कमिशन घेवून पावत्या मॅचिंग करायचा. त्यानुसार त्याने आतापर्यंत १०० कोटीहून अधिकच्या पावत्या मॅचिंग केलेल्या आहेत. तसेच कंडारेला अटक केली त्यावेळी त्याच्या ताब्यातून ३ हार्ड डिक्स आणि अनेक कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत. दरम्यान, या हार्ड डिक्समधून अनेक महत्वपूर्ण आणि गोपनीय माहिती समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपी जितेंद्र कंडारे हा अवसायक म्हणून संचालकाच्या जागेवर नियुक्त झाला होता. त्याची नियुक्ती ही संस्थेतील मालमत्ता पारदर्शीपणे शासकीय वेबसाईद्वारे कर्जदारांची मालमत्ता विक्री करून तसेच संस्थेकडे इतर येणे असलेला पैसा वसूल करून आलेला पैसा समप्रमाणात गुंतवणूकदार/ठेवीदारांना वाटप करावयाची जबाबदारी होती. परंतू आरोपी धरम साकला, विवेक ठाकरे, महावीर जैन, सुजित वाणी यांनी मिळून सुनिल झंवर, जितेंद्र कंडारे यांनी मिळून ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग केल्या. तसेच कंडारेची अन्य आरोपी कुणाल शहा या अहमदाबादच्या व्यक्तीशी कुठे, कशी व कोणामार्फत भेट घेतली?. त्याच्याशी संगणमत करून बनावट वेबसाईट तयार केली.
वेबसाईटचा सोर्सकोड कुणाकुणाला दिला?. तसेच या बनावट वेबसाईटव्दारे कोणकोणत्या संस्थेच्या मालमत्ता विक्री करावयाचे भासवायचे. याबाबत कुठे बैठका झाल्या?, त्यात या आरोपी व्यतिरिक्त अजून कोण सहभागी होते, हे आरोपी कंडारेकडून पोलीस तपास करणार आहेत. संपूर्ण घोटाळ्याचा मास्टर माईड कंडारेचे आहे की अन्य कोणी दुसरा?, या अनुषंगाने देखील पोलीस कंडारेकडे चौकशी करणार आहेत. कंडारेच्या घरातून सापडलेली साडेनऊ लाखाची रोकड आणि २५ लाखेचे दागिने या बाबत देखील कंडारेची पोलीस कोठडीत चौकशी होणार आहे. कंडारेला जळगाव आणून गुन्ह्या संबंधी अधिकचा तपास देखील पोलीस करणार आहेत.
मागील सात महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर घोटाळ्यात जळगाव शहरामध्ये धाडसत्र राबविले होते. यावेळी अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ अनेक पथके पाठवली होती. परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने कंडारेला सापळा रचून नुकतीच इंदूरमधून अटक केली होती. दरम्यान, कंडारेला आज न्यायालयात कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कंडारेला आता ९ जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
विजय वाघमारे (9284058683)