जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरच्या कार्यालयात एका आमदाराच्या लेटरपॅडसह बीएचआरच्या कर्जाच्या फाईली सापडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, हे लेटरपॅड नेमक्या कोणत्या आमदाराचे आहे, याबाबत जळगाव शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरला २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयाने तब्बल ११ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. या अकरा दिवसात पोलिसांना अनेक महत्वाचे धागेदोरे सापडले आहे. सुरजच्या ऑफिसमध्ये एका आमदाराच्या लेटरपॅडसह बीएचआरच्या कर्जाच्या फाईली सापडल्या आहेत. तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के देखील आढळून आले आहेत. सुरज झंवरच्या कार्यालयात अवसायक जितेंद्र कंडारे, सीए महावीर जैन, धरम सांखला यांच्यात बैठकी होत होत्या. या व्यतिरिक्त आणखी कुठं बैठका व्हायच्या याबाबतचा पोलीस तपास करीत आहेत. अहमदाबादच्या कुणाल शहाने याच ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून दिले होते. तसेच याच ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये कोड ठरवले जात होते. बीएचआरच्या मालमत्ता घेण्यासाठी साई मार्केटिंग कंपनीच पैसा पुरवत होती. त्यामुळे बीएचआर घोटाळ्यातून झंवरने कुठं-कुठं मालमत्ता घेतल्या याची माहिती पोलीस घेत आहेत.