जळगाव (प्रतिनिधी) अवसायानात गेल्यानंतर ‘बीएचआर’ पतसंस्थेवरवर अवसायक नेमण्यात आला होता. अवसायकाला अनेक अधिकार होते. परंतू इतरही अनेक अधिकारी बीएचआरच्या प्रशासकीय कामात महत्वपूर्ण भूमिका बजावत होते. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी म्हणून एकटा कंडारेच नव्हे तर इतरही अधिकाऱ्यांचे घोटाळ्यात ‘हात ओले’ झाल्याचा आरोप आहे. अगदी पोलिसांच्या तपासातही व्यवस्थापक, सनदी लेखापाल, टॅक्स ऑडीटर, लेखापरीक्षक, व्यवहाराची डेटा एन्ट्री करणारे, अशा लोकांची नाव समोर आलेली आहेत.
अवसायक जितेंद्र कंडारे या एका व्यक्तीला अवसायानात गेलेल्या बीएचआर सारख्या मल्टी स्टेट पतसंस्थेत कोट्यांवधीचा घोटाळा करणे शक्य होते का?, या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण कंडारे अवसायक असला तरी, इतरही अनेक अधिकारी बीएचआरच्या प्रशासकीय कामात महत्वपूर्ण भूमिका बजावत होते. दरम्यान, असेच अधिकारी आता आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार बीएचआरचा अवसायक आरोपी जितेंद्र कंडारे व सुजित वाणी हे एकमेकांचे चांगले परिचयाचे होते.
जितेंद्र कंडारे हा यापूर्वी सिद्धी व्यंकटेश सहकारी बँक जळगाव येथे अवसायक असताना सुजित वाणी हा तेथे कॅशीअरचे काम करीत होता. तर प्रमोद माळी हा बीएचआरमध्ये पूर्वीपासूनच व्यवस्थापक म्हणून नोकरीस होता. तसेच त्याला व्यवहाराची संपूर्ण कल्पना होती. तर धरम सांकला हा बीएचआरचा सन २००८ पर्यंत सनदी लेखापाल तर सन २००३ ते २०१४ पर्यंत टॅक्स ऑडीटर म्हणून कार्यरत होता. तसेच धरम सांकला याचा भागीदार निरज कासट याने सन २०१२ ते २०१४ पर्यंत बीएचआरचे लेखापरिक्षणही केले आहे. धरम सांकला याचा भाऊ योगेश सांकला याने बीएचआरचे टॅक्स भरण्याचे कामकाज केलेले आहे. योगेश सांकला व धरम सांकला यांचे कार्यालय एकच होते, असेही पोलीस तपासात समोर आलेय.
जितेंद्र कंडारे, सुजीत वाणी, प्रमोद माळी यांनी बीएचआर या वित्तीय संस्थेच्या ठेवी परत करणे आवश्यक व बंधनकारक असताना जाणीवपूर्वक गैरहेतूने, गैरउद्देशाने व एक विचाराने पूर्व नियोजित कटानुसार ठेवीदारांचा पैसा, कर्जदारांच्या मालमत्ता विक्री करून व त्यांचेकडून कर्ज रक्कन वसूल करून परत करणे आवश्यक असताना गैरहेतूने त्या परत केलेल्या नाहीत, असा आरोप पोलिसांनी संबंधितांवर ठेवला आहे. अगदी सुजीत वाणी याच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाचे वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद करतांना, सुजीत वाणी हा कंडारेचा खास माणूस होता, तोच सर्व बीएचआरमध्ये झालेल्या व्यवहाराची एन्ट्री करत होता. कारवाईसाठी जेव्हा पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आले. त्यावेळी वाणी हा त्याची कॅबिन बंद करुन पळून गेला होता. तसेच त्याने अधिकार्यांना बीएचआरचे रेकॉर्ड दिले नाही. त्याचा गुन्ह्यात महत्वाचा सहभाग असल्याबाबत पुरावेही अॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर सादर केले होते. त्यामुळे कंडारेवर कारवाई झाल्यानंतर आता बीएचआरमधील व्यवस्थापकीय विभाग, वसुली विभाग, न्याय आणि लवाद विभागातील काही अधिकारी, कर्मचारी रडावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीय.