जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत विश्वासू तथा उद्योजक सुनील झंवर यांच्याविरुद्ध भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधीत गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. परंतू आर्थिक गुन्हे शाखेच्या या कारवाईत गिरीश महाजन यांना टार्गेट पॉइंटवर ठेवून झंवर यांच्यावरील कारवाईचा फास अधिकचा आवळला जाणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथराव खडसे यांनी आपण याप्रकरणी २०१८ पासून तक्रारी केले असल्याचे सांगितल्यानंतर तर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. घरकुलच्या निमित्ताने सुरेशदादांचा भोवती आवळलेला फास आता पुन्हा एकदा बीएचआर चौकशीच्या निमित्ताने गिरीश महाजन यांच्या भोवती आवळण्यासाठी खडसे यांनी राजकीय डाव टाकल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधान आले आहे. तशात आज एकनाथराव खडसे यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधी २०१८ पासून दिल्लीसह राज्य सरकारकडे तक्रारी केलेल्या आहेत. तूर्त आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरु आहे. त्यांची कारवाई संपली की, सविस्तर बोलतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एखादं व्यवहार किंवा बँकेची नोंद बीचआर प्रकरणात सुनील झंवर आणि गिरीश महाजन यांच्यात आढळून आल्यास घरकुल प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचे खडसे रणनीती असल्याची चर्चा आहे. तर यानिमित्ताने राज्य सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना गिरीश महाजनांवरील राग काढता येणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात ईडीने (ED) केलेल्या कारवाईचा बदला घेऊन आमच्याकडे देखील छोटी ईडी असल्याचा संदेश शिवसेनेकडून भाजपला द्यायचा आहे.
तर दुसरीकडे बारामती जिंकून दाखवू शकतो, म्हणत कधीकाळी शरद पवार व अजित पवार यांना आव्हान दिल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. तसेच आता एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत आल्यामुळे गिरीश महाजन हे अधिकचे टार्गेट पॉइंटवर आले आहेत. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोर्टात सुनील झंवर यांना गुप्त कटाचा साथीदार म्हणत इतर आरोपींसह त्यांचे कोण-कोणत्या बँकेत खाती उघडली आहेत. त्या करीता त्याने कोणत्या कागदपत्रांचा उपयोग केला आहे?. तसेच व्यवहार तपासायचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यात एकही चिंधी सापडली तरी त्याचा साप बनविला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एकनाथराव खडसे हे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई संपल्यानंतर काय बोलतात? कुणाकडे सूचक इशारा करतात की, थेट नावं घेतात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.