जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी विवेक ठाकरे यांचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने आज फेटाळून लावला. त्यामुळे आता या घोटाळ्यात एजंट म्हणून भूमिका बजावणाऱ्या इतर संशयितांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.दरम्यान, सरकार पक्षाकडून ऍड. प्रवीण चव्हाण यांनी ठाकरेच्या जामीन अर्जाच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला होता.
बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यातील डेक्कनच्या गुन्ह्यात या आधी विवेक ठाकरेचा जामीन अर्ज नाकारलेला आहे. पावत्या मॅचिंग करुन एजंट विवेक ठाकरेने ठेवीदारांना गंडवण्याचा आरोप सरकर पक्षाने केला आहे.
विवेक ठाकरेचा जामीन फेटाळल्यामुळे इतर एजंट आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. बहुतांश संशयित एजंटांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अद्याप कुणालाही जामीन मिळालेला नाही. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक लवकरच इतर संशयित एजंटांना अटक करणार असल्याचे कळते.
या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बीएचआर प्रकरणात कोट्यावधी रूपयांच्या मालमत्ता मातीमोल भावात घेतल्याचा आरोप आहे. यात डिपॉजिटच्या रिसीट या ३०-४० टक्के दलालांच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. यात अनेक मोठ्या मंडळींनी मालमत्ता घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अनिल पगारीया याने जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, महावीर जैन, विवेक ठाकरे यांच्यासोबत संगनमत करुन अनेक ठेवीदारांची दिशाभुल केली आहे. त्यांच्यावर ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करुन देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. त्यांनी ३० टक्के रक्कम ठेऊन घेत ठेवीदारांना ठेवीतील ७० टक्के पैसे परत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे बीएचआरसह ठेवीदारांचे नुकसान झाले. तर कर्जदारांना बेकायदेशीरपणे लाभ मिळवून दिला आहे, असा युक्तीवाद पुणे कोर्टात सरकारी वकील प्रवीण चव्हाण व त्रयस्त अर्जदार अॅड.अक्षता नायक यांनी केला होता.