जळगाव (प्रतिनिधी) कोणत्याही खटल्यात न्यायालयाला सत्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी साक्षीदारच मार्ग दाखविण्याचे काम करीत असतो. साक्षीदाराच्या भरवशावरच गुन्हा शाबीत होण्याची आशा केली जाते. त्यामुळे साक्षीदारांच्या सुरक्षिततेला न्यायालय खूपच महत्व देत असते. परंतू बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरकडून दोन साक्षीदारांना धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आहे. त्यामुळे या खटल्यातील साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून फरार आरोपीकडून साक्षीदारांवर दबाव टाकण्याची हिंमत होतेच कशी?, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर फरारी झंवरची खटल्यावर बारीक नजर असल्याचेही सिद्ध होत आहे.
बीएचआर घोटाळ्यातील अन्य मुख्य संशयित सुरज झंवरच्या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी कोर्टाला सांगितले की, सुनील झंवरने खटल्यातील साक्षीदार अनुपम कुलकर्णी तसेच उमाळे नामक दोन साक्षीदारांना धमकाविले होते. या दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत सांगितले की, तुम्ही पोलिसांना माझ्या बाजूने जबाब द्या किंवा जबाब देण्यास जाऊच नका. दरम्यान, एक फरार आरोपी साक्षीदारांवर दबाव आणतोय, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असतील, तर या खटल्यात नि:पक्ष सुनावणी होणार नाही. तसेच या गोष्टीचा खटल्याच्या निकालावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एवढेच काय साक्षीदारांवर साक्ष बदलण्यासाठी दबाव, मारहाण आणि प्रसंगी त्याला मृत्यूला सामोरे जावे लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक प्रकरणांमधील काही साक्षीदारांचा गूढ मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे बीएचआर घोटाळ्यातील सर्व साक्षीदारांना योग्य ती सुरक्षा मिळालीच पाहिजे. तसेच सुनील झंवरला साक्षीदारांची माहिती कशी मिळाली?, त्यांचा संपर्क क्रमांक कसा मिळाला?, या सर्व बाजूने तपास होणे गरजेचे आहे.
दरम्यान, सुनील झंवरने मुंबई उच्च न्यायालयात २ मार्च रोजी अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने त्याला १५ दिवसांचे अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच या १५ दिवसाच्या काळात पुणे कोर्टातून अटकपुर्व जमीन घ्यावा,अशी सूचना केली होती. परंतू १५ दिवसांची मुदत संपल्यानंतरही झंवरने सेशन कोर्टातून जामीन न घेता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने झंवरला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर झंवरने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत पुन्हा एकदा १५ दिवसांचे संरक्षण मागीतले होते. परंतू न्यायालयाने ती मागणी फेटाळुन लावली होती. एवढेच नव्हे तर मागील दिलेले संरक्षण देखील आज काढून घेतले होते.
न्यायालयाने संरक्षण काढून घेतल्यामुळे सुनील झंवर पुन्हा एकदा कायदेशीररित्या बेपत्ता आरोपी झाला होता. सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडलेला नाहीय. दरम्यान, सुनील झंवर वेषांतर करून जळगावात येऊन गेला. तसेच तो परदेशात पळालाय, अशा बातम्या सुद्धा मध्यंतरीच्या काळात समोर येऊन गेल्या होत्या. परंतू आता थेट साक्षीदारांवर दबाव टाकल्यामुळे झंवरला लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांवर समोर निर्माण झाले आहे.