जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला जामीन दिल्यास तो पुन्हा साक्षीदारांना धमकावू शकतो, असा युक्तिवाद करत विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी झंवरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
साधारण नऊ महिने पोलिसांना गुंगार दिल्यानंतर सुनील झंवरला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी २८ जून रोजी जितेंद्र कंडारे याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, पुणे न्यायालयात सुनील झंवरने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर झंवरच्या वकिलांनी नुकताच आपला युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता. त्यानुसार सरकार पक्षाने देखील आपले म्हणणे सादर करत आहे. विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी आज न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिस तपासात सुनील झंवर याने अनुप कुलकर्णी तसेच उमाळे नामक दोन साक्षीदारांना धमकाविले होते. या दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत सांगितले होते की, तुम्ही पोलिसांना माझ्या बाजूने जबाब द्या किंवा जबाब देण्यास जाऊच नका. सुनील झंवर प्रमाणे सुरज देखील साक्षीदारांना धमकावू होऊ शकतो, असा युक्तिवाद अॅड. चव्हाण यांनी कोर्टासमोर आज पुन्हा एकदा मांडला. तसेच बीएचआर घोटाळ्याचा झंवर हाच मुख्य सूत्रधार आहे. तसेच तो फरारी असतानाही साक्षीदारांना संपर्क करून दबाव टाकलेला आहे. घुले रोड येथील जागेवर जोराने बँकेकडून कर्ज घेतले आहे असे अनेक मुद्दे आज सरकार पक्षाकडून न्यायालयात मांडण्यात आले. दरम्यान, आज सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता न्यायालय काय निकाल देतो ?, याकडे लक्ष लागून आहे.