गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये (Gujrat) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम केला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
आपल्या ट्विटमध्ये हार्दिक पटेल म्हणाले, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.
यापूर्वीही हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जाहीर टीका आणि भाजपच उघड कौतुक केले होते. तसेच त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या डीपीमुळेही चर्चांना अधिक हवा मिळाली होती. हार्दिक पटेलांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम डीपीमधून काँग्रेस गायब झाले होते. त्याजागी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो आला होता. अलिकडेच त्यांच्या ट्विटर बायोमधूनही काँग्रेस गायब झाले होते. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले होते.
















