नवी दिल्ली (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज दिल्लीत अधिवेशन पार पडले. त्यात अजित पवारांच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे अजितदादांचा पारा चढला आणि ते थेट व्यासपीठावरून उतरून निघून गेले. या हाय व्होल्टेज ड्राम्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना परतण्याची विनंती केली. पण त्यानंतरही ते व्यासपीठावर आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यानी एकच गदारोळ केला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित पवार भाषण करतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांची समजूत काढण्यासाठी गेल्या. तोपर्यंत शरद पवारांचे समारोपाचे भाषण सुरू झाले. यामुळे अजित पवारांना भाषण करण्याची संधीच मिळाली नाही.
राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले होते. सर्वच नेत्यांना बोलण्याची संधी दिली जात होती. अगोदर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. त्यात अजित दादांचा उल्लेख करण्यात आला त्यावेळेस संपूर्ण सभागृहात कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. दादांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना काहीवेळ आपलं भाषण थांबवावं लागलं. नंतर खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं. कार्यकर्ते अजित पवारांच्या भाषणाची आतुरतेनं वाट पाहत होते. तेवढ्यात प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना भाषण करण्याची विनंती केली. तेंव्हा मात्र अजित पवारांच्या समर्थकांनी मोठा गदारोळ केला.
‘अजित दादांना बोलू द्या…’ जोरदार घोषणाबाजी अजित पवार समर्थकांनी सुरू केली. तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. वातावरणात तणाव निर्माण झाला. हा तणाव निवळण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी पुन्हा हातात माईक घेतला आणि एक स्टेशन गेल्यावर दुसरे स्टेशन येईल असं सांगून सर्व कार्यकर्त्याना शांत राहण्याचं आवाहन केलं. जेंव्हा जयंत पाटलांचं भाषण सुरू झालं तेंव्हा अजित पवार व्यासपीठावरून उठले आणि थेट बाहेर पडले. दरम्यान, पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे खासदार आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना प्रामुख्याने स्थान होतं, असं आयोजकांनी खासगीत बोलताना सांगितलं.