जळगाव (प्रतिनिधी) भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी (Bhosari Land Scam) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभागाने (ACB) या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खडसे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलेले जात आहे. दरम्यान, भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी 31 जानेवारी 2023 पर्यंत तपास पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच 31 जानेवारी 2023 पर्यंत खडसेंना अटक न करण्याच्याही सूचना न्यायालयाच्या दिल्या आहेत.
दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत दिवाळीनंतर वाढ होणार आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील बंड गार्डन येथे एकनाथराव खडसे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी खडसे यांची चौकशी झाल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. मात्र, तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचाच तपास न झाल्याचा आक्षेप तक्रारदार यांनी केला आहे. एकूणच न्यायालयाने पुन्हा दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. खडसे हे भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात पुन्हा अडकणार असल्याचे बोलले जात आहे. खडसे यांना चौकशीत जवळपास क्लीनचिट मिळेल अशी खात्री होती, मात्र नव्याने तपास केला जाणार असल्याने खडसे यांची अडचण वाढली आहे.
जुलैमध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना
भोसरी प्रकरणी जुलैमध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यानंतर आता तपासी अधिकाऱ्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर फिर्यादीने पुन्हा कोर्टात तक्रार दिल्यानंतर शासनाच्यावतीने न्यायालयात पुन्हा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने काही अटी शर्तीवर तपास करण्याची परवानगी दिली. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टीनंतर तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयाकडून भूखंड घोटाळ्याची कागदपत्रे मिळणार असून दिवाळीनंतर कागदपत्रं मिळाल्यानंतर भोसरी भूखंड घोटाळ्याचा पुन्हा तपास सुरू होणार आहे. या प्रकरणातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार ज्या मुद्द्यांवर तपास झाला नाही, त्याचा विचार करून पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाचे दिले आहेत. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात एसीबीकडून गुन्हा दाखल आहे.
काय आहे प्रकरण
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथराव खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली होती. त्यानंतर हे प्रकरण मागे पडले होते, मात्र आता पुन्हा हे प्रकरण पुढे आल्याने खडसे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे.