मुंबई (वृत्तसंस्था) शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. दरम्यान, चालक एकनाथ कदम त्याचे जबाब बदलत असून त्याबाबत त्याची सखाेल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी विनायक मेटे यांचा भाचा बाळासाहेब चव्हाण याने बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
चव्हाण म्हणाले की, विनायक मेटे यांच्याकडे मागील 12 वर्षापासून कदम काम करत हाेता. 14 ऑगस्ट राेजी मेटे यांचे वाहन वेगाने पळवण्यात आले त्याबाबत हायस्पीडच्या पावत्या झाल्या आहेत. घटनेच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी तुषार काकडे यांचा मला फाेन आला व त्यांनी साहेबांच्या गाडीचा अपघात झाला असून आपल्याला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार मी मेटे यांचा खासगी सचिव विनाेद काकडे यांना फाेन करुन वाहनावर चालक काेण याची माहिती घेतली.
मेटे यांच्यासाेबत एकनाथ कदम असल्याचे समजले. त्यानुसार एकनाथला मी फाेन करुन विचारणा केली. तर त्याने मला माेबाईलवर बाेलताना सुरुवातीला ओळखले नाही. तसेच अपघातग्रस्त जागेचे लाेकेशन पाठव असे सांगितले असता, ते ही पाठवले नाही. ताे सातत्याने रडत हाेता. परंतु लाेकेशन देत नव्हता. मी कधी दुसऱ्या क्रमांकावरुन त्यास फाेन केला तरी ताे मला माझ्या आवाजावरुन ओळखत हाेता.
मी त्यास मदत देऊ का? साहेबांची तब्येत कशी? अशी विचारणा केली असता त्याने साहेबांना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले असून केवळ डाेक्याला व पायाला लागल्याचे सांगत हाेता. तसेच अपघातानंतर 20 मिनिट मी त्यांच्याशी बाेलत हाेताे असे सांगितले. अखेर काहीवेळाने त्याने दुसऱ्या माणसाकडे फाेन दिल्यावर, मला अपघात नेमका कुठे झाला याची माहिती मिळाली. त्यांनी विनायक मेटे यांचा जागीच अपघाती मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यांचा सुरक्षारक्षक पाेलfस बेशुध्द झाल्याचे सांगितले आणि चालकास काेणतीही इजा झाले नसल्याची माहिती दिली. चालक एकनाथ कदम हा पाेलीसांना जबाब देतानाही सातत्याने त्याचे जबाब बदलत हाेता. त्यामुळे हा अपघात की घातपात अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली असून त्याची चाैकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.