मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं आहे. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानीही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. अनिल परबांच्या पुण्यातील मालमत्तांवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.
सचिन वाझे याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली आहे.