मुंबई (वृत्तसंस्था) : संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.
आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. आगामी सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लढवणार आहे. लोकशाही आणि प्रादेशिक आस्मिता जपण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांची युती केली आहे. लोकशाहीला चिरडण्याची भूमिका घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,असे ठाकरेंनी सांगितले आहे.
आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली. राष्ट्रीय स्वयसेवक संघाची विचारधारा काय आहे, भाजपची संध्याची विचारधारा ही संघाची आहे का? भाजप संघाची विचारसरणी पुढे नेत आहे का असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.तर असंघाची संघ तुटला बरे झाले, शिंदे गेले असे म्हणत त्यांनी शिंदेंवरही निशाणा साधला आहे. तर महाराष्ट्रात जे काही घडवलं किंवा बिघडवलंय ही महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवरायांच्या, संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे. हा महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल, असा आपण घडवू. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलेला आहात म्हणून मी तुमचं स्वागत करतो”, असं यावेळी उद्धव टाकरे संभाजी ब्रिगेडला उद्देशून म्हणाले.