नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी (Maharashtra political crisis) आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांनी पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन केले आहे. त्यात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. नरसिंहा यांचा घटनापीठात समावेश आहे. दरम्यान, शिंदे गटाने आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केल्या आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता घटनापीठ काय निर्णय देणार याचीच उत्सुकता आहे.
घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळीत (Chief Justice Uday Lalit) यांनी त्यात स्वतःचा समावेश केलेला नाही. एकनाथ शिंदे सरकारची घटनात्मक वैधता, उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 सदस्यांवर बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले निमंत्रण आणि विधानसभा अध्यक्षांनी निवडीला दिलेले आव्हान, हे सर्व मुद्दे घटनात्मक तरतुदींशी संबंधित असल्याने यावर सखोल सुनावणीची गरज आहे. यासाठी सर्व याचिकांवर घटनापीठापुढे सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले होते.
शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाही लांबवली जात असल्याचा आरोप करत घटनापीठापुढील सुनावणीसाठी शिंदे गटाने काल मंगळवारी सरन्यायाधीशांना विनंती केली होती. या प्रकरणी जवळपास 11 मुद्द्यांवर हे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टाचे बेंच ठरले असून पाच न्यायाधीशांसमोर सत्ता संघर्षाची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठाचे गठन केले आहे. हे पाच सदस्यीय खंडपीठ आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.
वेगवेगळ्या परस्परविरोधी याचिकांमुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा गुंता वाढलाय. आमदारांना अपात्र करण्याची मागणी, विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, राज्यपालांची भूमिका, खरी शिवसेना कुणाची, विधानसभा अध्यक्षांची निवड, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे महाराष्ट्राचा राजकारण ढवळून निघालं आहे. या सगळ्या विषयांवर एकत्रित सुनावणी आता घटनापीठापुढे घेतली जाणार आहे.