मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे सुपूत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात केल्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मी माझ्या पक्षप्रवेशाचे वडीलांना आधीच स्पष्ट कल्पना दिली होती हेही भूषण देसाई यांनी स्पष्ट केले. तर भूषणने आज शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नव्हते, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली आहे.
काय म्हणाले सुभाष देसाई !
सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे. माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्री सोबत मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे असे सुभाष देसाई यांनी म्हंटले आहे.
भूषण देसाई आणि मुख्यमंत्री म्हणाले !
भूषण देसाई यांच्या पक्ष प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईत यांच्याकडे सत्ता होती पण गेल्या अनेक वर्ष पण त्यांना काही करता आले नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय. आम्ही करत असलेल्या कामामुळे भूषण देसाई प्रभावी झाले. त्यानंतर त्यांनी पक्षात काम करण्याची इच्छा दर्शवली. भूषण यांनी काम करणाऱ्या लोकांसोबत राहायचा निर्णय घेतला आहे. तसेच यावेळी बोलता भूषण देसाई म्हणाले आहेत की, बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.