मुंबई (वृत्तसंस्था) पेगासस हेरगिरीच्या मुद्दयावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबईत भाजप (BJP) आणि काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पहायला मिळालं. पेगासस प्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते दादर रेल्वे स्थानक परिसरात आंदोलनासाठी भाजप कार्यालयासमोर दाखल झाले आणि त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरुन आज दुपारी काँग्रेसचे कार्यकर्ते दादर येथील भाजप कार्यालयासमोर आंदोलनासाठी एकत्र जमले. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते आणि नेतेही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आधीच होता. मात्र, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होते.
या आंदोलनात काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हे सुद्धा उतरले होते. तर भाजपचे नेते प्रसाद लाड हे सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरीकडे भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर भाजपच्याही काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.