जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना नेते आणि पाणी पुरवठामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन भाजपनं बेईमानी केली, अशा शब्दात ना. पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला.
भाजपने लोकसभा निवडणुकीत जळगावात चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते, त्यावेळी मी स्वतः भाजपकडे तक्रार केली होती, शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन पहिली बेईमानी भाजपने केली, त्यावेळेस भाजपने बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती. पहिलं बेईमान कोण हे अगोदर भाजपने तपासावे मग बोलावे. पहिले ते बेईमान झाले नसते तर, आज ते जसे म्हणतायेत तसे उद्धव साहेब बेईमान झाले नसते, असं वक्तव्य ना. गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांसारखे निष्ठावंत असताना त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही? असा सवाल केला होता. त्यावर उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, हा जर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. पण हा एकट्या शिवसेनेचा विषय नव्हता. सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, असं स्पष्टीकरण ना. पाटील यांनी दिलं.