मुंबई (वृत्तसंस्था) आरएसएसने भाजपला राजकीय जन्म दिला. मात्र आता आरएसएसच्या दृष्टीने १०० वे वर्ष धोक्याचे असून भाजप आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, त्यांच्यावर बंदीही घालू शकतो, असा टोला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. हॉटेल ग्रँड हयात येथे शनिवारी इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी हा टोला लगावला.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजप स्वयंपूर्ण झाला आहे, आता त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस) ची गरज भासत नाही, असे म्हटले होते. याचच समाचार घेत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करायचे आणि त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजप करत आहे. मोदी यांना अजूनही नवाझ शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळेच ते सारखे भाषणात पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. भाजपने १० वर्षे महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले. आता इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. ४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार असून अच्छे दिनची सुरुवात होणार आहे, असे ठाकरे टीका करताना म्हणाले.
या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.