नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गतवर्षी भाजपाने इलेक्टोरल बाँडच्या (रोखे) माध्यमातून जवळपास ७४ टक्के निधी मिळवला असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला मात्र फक्त नऊ टक्केच निधी मिळवण्यात यश आलं. काँग्रेसला एकूण ३४३५ कोटींची देणगी मिळाली आहे. निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली.
सन २०१९-२० या वर्षामध्ये विक्री करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या एक तृतीयांश निधीवर भाजपने कब्जा केल्याचं स्पष्ट झालंय. सन २०१९-२० या वर्षासाठी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या निधीपैकी तब्बल ७४ टक्के निधी एकट्या भाजपला मिळाला आहे. तर केवळ ९ टक्के निधी हा काँग्रेसला मिळाला आहे. एकूण विक्री झालेल्या ३४२७ कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्डपैकी भाजपला ७४ टक्के म्हणजे २५५५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. सन २०१७-१८ या वर्षामध्ये भाजपला ७१ टक्के इलेक्टोरल बॉन्ड निधी मिळाला होता. आता त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली असून तो ७४ टक्क्यावर पोहोचला आहे. सन २०१७-१८ साली भाजपला २१० कोटी रुपये मिळाले होते. त्यात आता तब्बल दहा पटीने वाढ होऊन २५५५ कोटी रुपये मिळाले आहेत.
काँग्रेसला या काळात फक्त ३८३ कोटी रुपये मिळाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २९.२५ कोटी रुपये मिळाले आहेत. टीएमसीला १००.४६ कोटी रुपये तर शिवसेनेला ४१ कोटी रुपये मिळाले आहेत. आम आदमी पक्षाने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून १८ कोटी रुपये जमवले आहेत.