चाळीसगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांना जाहीर करण्यात आल्यानंतर आज भाजपच्या वतीने भव्य जाहीर सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चव्हाण यांच्यासह इतर ३६ उमेदवारांचे नगरसेवक पदासाठीचे अर्ज दाखल करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित झालेल्या या सभेला माजी केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, आमदार मंगेश चव्हाण, भाजप पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह भाजपचे आजी–माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी तसेच शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या उमेदवारांनी शहरातून वाजतगाजत काढलेल्या रॅलीद्वारे सभास्थळी प्रवेश करत उपस्थितांना उत्साहात सामील केले.
सभेपूर्वी प्रतिभा चव्हाण यांनी शिवनेरी निवासस्थानी कुलदैवतांचे दर्शन घेऊन मनोभावे आशीर्वाद प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून शहरातील युगपुरुष आणि समाजप्रवर्तक—छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत जगनाडे महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि वीर भाई कोतवाल—यांच्या स्मारकांना विनम्र अभिवादन करून नव्या जबाबदारीसाठी प्रेरणा घेतली.
















