पुणे (वृत्तसंस्था) भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली.
संबंधित महिला अधिकाऱ्याने फोन कार्यकर्त्यांच्या हातात दिला. त्यावर कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पिकरवर ठेवायला सांगुन पुन्हा एकदा अर्वाेच्च भाषेत शिवागीळ केली. तसेच काही पुरुष अधिकाऱ्यांचे नाव घेत त्यांच्याही नावे शिवीगाळ करीत त्यांना धमकावले. या मोबाईल रेकॉर्डिंगचे संभाषण आता व्हायरल झाले असून ते काही महिन्यांपूर्वीचे आहे.