पुणे (वृत्तसंस्था) भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत. काही वर्षांपासून गिरीश बापट हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. यामुळे गेल्या काही महिन्यात ते सक्रीय राजकरणापासून दूर होते. गिरीश बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक म्हणून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला होता. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते पुण्याकडे रवाना झाले आहेत.