मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या विधानसभेचं अध्यक्षपद भाजपकडे असणार असून त्यासाठी पक्षानं आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी नार्वेकरांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला.
राज्यपालांनी येत्या रविवार-सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे, तर त्यापाठोपाठ नव्या सरकारची बहुमत चाचणीही पार पडणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहुल नार्वेकर हे याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष बदलून आले आहेत. सेनेत असताना आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
राहुल नार्वेकर कोण आहेत?
राहुल नार्वेकर हे मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने मोठा भूकंप झाला होता. दरम्यान, भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. विखे हे काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले आहेत. या उमेदवारीद्वारे त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं, अशी चर्चा होती.