मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने खताच्या किंमती वाढवल्यानंतर त्याचे कृषी क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री संदानंद गौडा यांना पत्र दिलं होतं. पवार यांच्याबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गौडा आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तौमर यांना पत्र लिहिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि खते व रसायन मंत्री सदानंद गौड या दोघांनाही पत्रं लिहून ही मागणी केली. खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली असून त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, असं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
गेले वर्षभर कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे, अशी मागणी करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत व योजना सुरू केल्या आहेत, याकडेही त्यांनी या दोन्ही मंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.
पाटील यांनी भाजपाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनाही पत्र पाठविले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान जाहीर करावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती पाटील यांनी चहर यांच्याकडे केली आहे.