मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या २६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर, आज भाजपाची देखील या अनुषंगाने बैठक पार पडली, या बैठकीनंतर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत, २६ जून रोजी भाजपा राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. तर, “…आता रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही” असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला इशाराही दिला.
पत्रकारपरिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, “पंकजा मुंडेंनी सांगितलेलं खरं आहे, आज आम्ही सर्व ओबीसी नेते या निकषावर आलो आहोत, की या महाराष्ट्र सरकारला ओबीसींचं आरक्षण द्यायचं नाही. म्हणून २६ जून रोजी महाराष्ट्रात एक हजार ठिकाणी भाजपा आंदोलन करेल. गरज पडली तर आम्ही सर्वजण पुन्हा न्यायालयात जाऊ आणि या सरकारला ओबीसी आरक्षण देण्यासाठी भाग पाडू हे आम्ही आज ठरवलं आहे. या सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं, या सरकारने ओबीसींवर अन्याय केला आणि आता नौटंकी करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो आणि आता रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. या निर्णयावर आम्ही सर्वजण आलेलो आहोत.
तसचे, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना व पंकजा मुंडे या ग्रामविकासमंत्री असताना, ३१ जुलै २०१९ रोजी ओबीसींचं राजकीय आरक्षण जे महाराष्ट्रात लागू होतं ते कायम ठेवण्यासाठी अध्यादेश काढला. सर्वोच्च न्यायालयाने त्या अध्यादेशाप्रमाणे जिल्हापरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी परवानगी दिली. महाविकासआघआडी सरकारच्या काळात ३१ जानेवारीपर्यंत तो अध्यादेश लागू होता. मात्र ३१ जानेवारी रोजी या सरकारने तो अध्यादेश रद्द केला आणि त्याचे पडसाद आहेत की, न्यायालयात आज ओबीसींचं आरक्षण टिकलं नाही.” असं बावनकुळेंनी बोलून दाखवलं.
१०० हजार स्पॉटवर आंदोलन
येत्या २६ जून रोजी ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. राज्यातील एक हजार स्पॉटवर हे आंदोलन होणार आहे. सरकारकडून ओबीसींची दिशाभूल होत असून त्याचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे, असं सांगतानाच आरक्षण देणं हे सरकारच्या हातात असताना सरकारमधील लोक मोर्चे का काढत आहेत? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.