नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Up Election 2022) पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची पहिली यादी (bjp candidates first list released) जाहीर केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) गोरखपूर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
यावर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. यामध्ये सर्वात मोठं राज्य म्हणजे उत्तर प्रदेशच्या देखील निवडणुका आहेत. सात टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकांसठी काँग्रेसने पहिल्यांदा १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर सपा आणि बसपाची यादी देखील आली आहे. त्या मागोमाग लगेच भारतीय जनता पार्टीची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये ५७ नावांचा समावेश आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघावरही शिक्कामोर्तब झालं आहे. पहिल्या टप्प्यात ५७/५८ आणि दुसऱ्या टप्प्यात ३८/५५ जागांवर उमेदवारांची यादी जाहीर करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर त्यांच्यासाठी गोरखपूर शहर हा मतदारसंघ राखीव करण्यात आला आहे. योगी याआधी गोरखपूरच्या पारंपारिक मतदरासंघातून संसदेत जात होते. त्यांच्याशी संबंधित मठाचा हा मतदारसंघ आहे. आता विधानसभेला देखील ते याच ठिकाणाहून निवडणूक अर्ज भरणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे प्रयागराज जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत.