रांची (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसामध्ये तक्रार दिल्यावर आरोपी भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.
संबंधित घटना झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम येथील आहे. तर संजय मिश्रा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून ते भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहेत. याबाबत माहिती देताना चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी मंगळवारी सांगितलं, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितलं की, पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
तसेच पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोपात देखील तथ्य आढळलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय मिश्रा एप्रिल महिन्यापासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत होता. आरोपी संजय मिश्रा याने पीडित महिला खेळाडूचा एक फोटो काढला होता. संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचं लैंगिक शोषण करत होता. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.