चाळीसगाव (प्रतिनिधी) हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र श्रावणतळे येथील साडेसातशे वर्षे जुने सर्वेश्वर महादेव मंदिर आता नव्या तेजाने उजळणार आहे. वनविभागाची राखीव जमीन जीर्णोद्धारासाठी देण्यास राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली असून, ११ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून ही जमीन श्रीनाथ बाबा ट्रस्ट, राजदेहरे यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या दहा वर्षांत राज्यात मंदिर ट्रस्टसाठी वनजमीन मिळण्याचे हे पहिलेच उदाहरण ठरले आहे, ज्यामागे आमदार मंगेशदादा चव्हाण व श्रीनाथ बाबा ट्रस्ट यांचा चार वर्षांचा अखंड पाठपुरावा, सातत्य आहे. मंदिर परिसर वनविभागाच्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळे जीर्णोद्धाराच्या मार्गात अनेक अडथळे होते. याकाळात अनेक राजकीय आश्वासने मिळाली पण ती केवळ शब्दांपुरतीच राहिली, मात्र मंगेशदादांनी ८ जुलै २०२१ रोजी मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळाप्रसंगी हजारो शिवभक्तांना दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवला.
शिवभक्तांचा जल्लोष –
“महादेवाने दिला श्रावण सोमवारी आशीर्वाद”
जमीन मंजुरीची अधिकृत घोषणा होताच मंदिर परिसरात शिवभक्त आणि ग्रामस्थांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. घंटानाद, अभिषेक आणि “हर हर महादेव” च्या गजरात महादेवाचे पूजन करण्यात आले.
“श्रावण सोमवारीच आणि श्रीसंत श्रीनाथ महाराज यांच्या वाढदिवसाच्या पुण्यपर्वाच्या तिथीस मंजुरी मिळणे ही महादेवाची कृपा आहे, आणि हा क्षण घडवणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आम्ही ऋणी आहोत,” असे अनेक शिवभक्तांनी सांगितले.
यावेळी संत भोलेगिरी महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर भाऊ जाधव, संतोष देशमुख, सचिन भाऊ पवार, ज्ञानेश्वर बागुल, भूषण देशमुख, भिकनराव देशमुख, ईश्वर राठोड, अंकुश राठोड, राजाराम काकडे, रामदास देशमुख, राजू कासार, नाना आहेर, विकास देशमुख, प्रेमराज देविदास जाधव, राजू राठोड, वसंत चव्हाण, धनराज राठोड, रमेश बन्सी राठोड, शंकरराव जाधव, संतोष मोकाटे, दिलीप राठोड, आदी भक्तगण उपस्थित होते.
पूर्वीच केलेली विकासकामे – जीर्णोद्धाराची पायाभरणी –
आमदार निधीतून यापूर्वीच गंगाश्रम ते श्रावणतळे दरम्यान सुमारे १ किमी डांबरीकरण पूर्ण झाले आहे. तसेच धरणाच्या सांडव्याजवळ सिमेंट पाईप मोरी बसवून पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आल्या आहेत. यामुळे यात्रेकरूंना व पर्यटकांना मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल.
पर्यटन आणि रोजगाराला चालना –
राजदेहरे परिसराचे ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक महत्त्व मोठे आहे. सर्वेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर या परिसरात
• मोठा महादेव मंदिर
• राजदेहरे किल्ला
• श्रावणतळे धरण परिसर
• गंगाश्रम
यांसारखी पर्यटनस्थळे एकत्रितपणे भाविक व पर्यटकांना आकर्षित करतील.
शिवभक्तांना मंदिरात दिलेला शब्द पाळला – आ. मंगेशदादा चव्हाण
“श्रावण महिन्याच्या सोमवारी महादेवाचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी शिवभक्तांना मंदिरात दिलेला शब्द पाळला याचा अभिमान आहे. विकासाची कामे करत असताना आपला वारसा जपणेही तेव्हडेच महत्वाचे मी मानतो. मी केवळ निमित्तमात्र असून हे केवळ महादेवाचा आशिर्वाद, श्रीनाथ बाबा यांची साधना व हिंदुत्ववादी भाजपा महायुती सरकारमुळे शक्य झाले आहे. श्रीनाथ बाबा ट्रस्ट, राजदेहरे व पंचक्रोशीतील भाविकांनी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे. याकामासाठी मी आमदार झाल्यानंतर सुरुवातीला पाठपुरावा करणारे स्व.अनिलभाऊ नागरे यांचे देखील स्मरण मी यानिमित्ताने करतो. हा जीर्णोद्धार केवळ मंदिराचा नाही तर आपल्या संस्कृती, श्रद्धा आणि पर्यटन विकासाचा आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.