बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या सहा जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. यात शिवसेनेला दोन जागा तर तीन जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर एका ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांना समसमान मते मिळाली असून यात भाजपच्या विजय बडगुजर यांना नशिबाने साथ दिल्याने ते विजयी झाले आहेत.
बोदवड येथील नगरपंचायत निवडणुक ही दोन टप्प्यात झाली होती. यातील पहिला टप्पा २१ डिसेंबर तर दुसरा टप्पा काल म्हणजे १८ जानेवारी रोजी झाला होता. यात बहुरंगी लढत असली तरी प्रमुख मुकाबला हा अर्थातच आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार एकनाथराव खडसे यांच्यात होता. यामुळे दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. यानंतर आमदार गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली. एकीकडे भाजप-सेना युती तुटली असतांनाही बोदवड येथे मात्र दोन्ही पक्षांचे नेते एकत्रीत आल्याचा संदेश सर्वत्र गेला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी याचे खंडण केले असले तरी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमिवर, आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. यात प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक ३ मथुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.
प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादीचे सैयद सईदावी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम २१९ मते यांना पराभूत केले.
भाजपचे विजय बडगुजर विजयी
प्रभाग क्रमांक ५ प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादीचे गोपाळ गंगतिरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान म्हणजे ३७४ मते मिळालीत. यामुळे ईश्वरचिठ्ठीने यातील विजेता ठरविण्यात आला. यात नशिबाचा कौल हा भाजपचे उमेदवार विजय बडगुजर यांना मिळाला. यामुळे ते विजयी झाले आहेत. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने बोदवडमध्ये खाते उघडले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी तीन, शिवसेना दोन आणि भाजपला एका जागेवर यश मिळाले आहे.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.