बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत कार्यालयात मंगळवारी सायंकाळी टेंडर भरण्यावरून दोन नगरसेवकांमध्ये वाद झाला आणि या वादातून हाणामारी झाली. परंतू हे प्रकरण रात्री उशिरा आपसात मिटविण्यात आले.
नेमका काय झाला राडा ?
या बाबत माहिती अशी की, आज सायंकाळी साडेचार पाच वाजेच्या सुमारास नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष ,काही नगरसेवक व इतर नगरसेवकांचे प्रतिनिधी काही चर्चा करत असतांना शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हाजी सईद बागवान आणि राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक दिपक झांबड यांच्यात काही कारणांमुळे वादास सुरवात झाली. त्याचे पर्यावसन अपशब्द उच्चारत धक्काबुकीत झाले. उपस्थित इतरांनी हा वाद मिटवला व दोघांनाही आपापल्या घरी जा असे सुचवले. परंतू या बाबत पोलिसांना कळवले गेल्याने तेथे आलेल्या पोलिसांनी त्यांनी नगरसेवक झांबड यांना गाडीत बसा आम्ही तुम्हाला सोडून देतो असे सांगितले. पण त्यांनी मी मोटरसायकलने घरी जातो असे सांगितले. यानंतर ते घराकडे जात असतांना नगरसेवक बागवान यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना या वादाची माहिती मिळताच तिकडे आले आणि त्या वेळेस कोणीतरी झांबड यांना वीट फेकून मारली. त्यामुळे तिथे पुन्हा धक्काबुकीस हाणामारीस सुरवात झाली. मात्र लगेच काही नागरिक व पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.
पोलीस ठाण्यात दिलजमाई !
यानंतर नगरसेवक झांबड व नगरसेवक बागवान आपापल्या समर्थकांसोबत पोलीस ठाण्यात गेले. तिथे पुन्हा दोघं गटात शाब्दिक वाद होऊ लागले. त्यावर पोलिसांनी इथे आता वाद विवाद करू नका. ज्यांना काही तक्रारी द्यायच्या असतील त्यांनी तक्रार द्या, अशी भूमिका घेतली. मात्र तिथे आलेल्या काही राजकीय कार्यकर्त्यांनी झाला तो प्रकार चुकीचा झाला. आता हा वाद मिटवता घ्या, अशी दोनही बाजूंची समजूत घालण्यास सुरवात केली. अखेर दोन तासांच्या समजूत नाट्यास यश आले आणि परस्परांविरुद्ध कोणतीही तक्रार न देता हे दोघेही नगरसेवक घरी निघून गेले.
दोघं नगरसेवक दिग्गज राजकीय व्यक्तिमत्व !
हा सर्व प्रकार सुरू झाल्याची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी नगरपंचायत कार्यालयासमोर व त्यानंतर पोलीस ठाण्याचे समोर जमली होती. या वादाचे कारण मागील कामांची बिले,टेंडर व नवीन टेंडर या वरून झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. दिपक झांबड हे मागील नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते होते. या वेळेस त्यांचा प्रभाग महीला राखीव झाल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या पत्नीस उभे केले होते. मात्र अवघ्या सहा मतांनी पराभव झाल्याने दिपक झांबड यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. तर हाजी सईद बागवान यांनी बोदवड ग्रामपंचायत असतांना उपसरपंच, सदस्य असे पद भूषवले होते. तसेच बोदवड नगरपंचायत झाल्यावर त्यांच्या पत्नी या प्रथम नगराध्यक्षा झाल्या होत्या.
नागरिकांमध्ये संतापाची लाट !
एकीकडे बोदवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली पाणी समस्या सोडवण्यासाठी आश्वासने देऊन सुद्धा ही समस्या अद्यापही सुटली नाही. लोकांच्या समस्या सोडवणुकीकडे सभागृहात लक्ष न देता केवळ बिले, टेंडर, यावर अनुभवी नगरसेवक असे सभागृहात आणि रस्त्यावर वाद घालतात. या बाबत काही लोक नगरसेवकांवर हसत होते. तर काही नागरिक अश्या वर्तनाबद्दल खंत व्यक्त करत होते. तसेच कार्यकाळात सुद्धा टेंडर वादावरून कार्यालयात झालेल्या वादाचे व एका नगरसेवकाने कार्यालयात भिंतीवर, कपाटावर मारलेल्या बुक्क्यांची सुद्धा आठवण काढत नागरीक खमंग चर्चा करत होते. दरम्यान, मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांची बदली झाल्याचे वृत्त आहे. नवीन मुख्याधिकारी येण्याच्या आधी असे गंभीर वादाचे प्रसंग घडल्याने नवीन मुख्याधिकारी यांची कामकाज राबवतांना कसोटी लागणार आहे.
















