मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान बॉलिवूडचा अक्शन हिरो अक्षय कुमार याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्व नियमांचं पालन करून मी आयलोशनमध्ये आहे. मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं असून आवश्यक तो वैद्यकीय सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यानी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसंच काळजी घ्यावी. मी लवकरच पुन्हा भेटेन,” असं ट्वीट अक्षय कुमारनं आपल्या फॅन्ससाठी केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या अतरंगी रे या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं होतं. अक्षय कुमारनं ट्वीट करत याची माहिती दिली. “अतरंगी रे चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. मी आता आनंद एल राय यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे. माझा सहकलाकार धनुष आणि सारा यांनाही या चित्रपटासाठी शुभेच्छा,” असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं होतं. याशिवाय अक्षयने या चित्रपटाचे लेखक हिमांशू शर्मा आणि संगीतकार ए.आर. रहमान यांचेही आभार मानले होते.















