धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव बु.येथील एका शेतकऱ्याच्या कापसाच्या वजनात अफरातफर करून चक्क ३८५ किलोची हेराफेरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी आवाज उठविला आहे. दरम्यान, शिवराम पाटील यांनी याबाबत पणन महासंघाच्या राज्यपातळीवरील अधिकारी तसेच संचालक संजय पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच यानिमित्ताने पणन महासंघातील भ्रष्ट्राचाराची कीड पुन्हा समोर आली असल्याचे म्हटले आहे.
शिवराम पाटील यांनी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बोरगाव बु. येथील शेतकरी अशोक धोंडू मराठे यांचा कापसाला ग्रेडर साळुंखे यांनी ५३५५ रुपये प्रति क्विंटल भाव लावला. ट्रक नंबर (एमएच-१८,एए०४२०) या मधील कापूस पिंपळे फाट्यावरील शगुन जीनींगमधील ईलेक्ट्रॉनीक वजन काट्यावर मोजला. त्यात ६०क्विंटल २० किलो कपाशी होती. ट्रकमधील कापूस उतरवून रिकाम्या ट्रकचे वजन केले तर ते २४४५ किलो असतांना २८३० किलो लिहीले. चक्क ३८५ किलोची हेराफेरी. ही हेराफेरी लपवण्यासाठी शेतकरीला कॉम्प्युटराईज्ड वेट रीसीट दिली नाही. इंडिकेटरचा फोटो काढू दिला नाही. ट्रकसहित कापसाचे वजन ६०२० किलो. रिकाम्या ट्रकचे वजन २८३० किलो होते. कापसाचे निव्वळ वजन ३१९० किलो असल्याची पिंक कलरची पावती शेतकरीला दिली. त्यावर खरेदीदारासह शेतकरीऱ्याची सही नव्हती. तसेच कपाशी घेणाऱ्या जीनींगचा देखील शिक्का नाही. त्यामुळे अशी पावती घेणाऱ्या शेतकरीला वजनमध्ये संशय आला म्हणून त्यांनी तोच रिकामा ट्रक कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या वजनकाट्यावर मोजून पावती घेतली. तेंव्हा ट्रकचे वजन २४४५ आढळले.
बाजार समितीतून तशी शेतकऱ्याने रीतसर पावती घेतली. त्यानुसार २८३०-२४४५ बरोबर ३८५ किलो होते. त्यानुसार तब्बल ३८५ किलो कापूस या टिमने चोरला. ३८५×५३५५ बरोबर २०,६१६ रूपयाची चोरी झाली. त्यामुळे याची तक्रार १)जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव,२)आयुक्त ,सहकार व पणन महासंघ ,पुणे.,३)जॉईंट डायरेक्टर ,सहकारी संस्था नाशिक.,४)मैनेजींग डायरेक्टर ,सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ ,नागपूर. ५) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीत पावत्यांची शहानिशा केली. तेथे सुद्धा रेकॉर्डवर पांढरी पावत्या अशाच पद्धतीने आढळल्या. ऑडिट करणारे श्री.पाटील यांच्या समोर त्या पावत्यांची शहानिशा केली. त्या सर्व पावत्यांवर शेतकरी, खरेदीदार यांच्या सह्या नाहीत. खरेदी करणाऱ्या जीनींगचा शिक्का नाही, का असे?, असा सवाल देखील शिवराम पाटील यांनी उपस्थित केला आहे.
जळगाव जिल्हा जागृत जनमंचने या घटनेची माहिती पणन महामंडळाचे संचालक संजय पवार यांना दिलेली आहे. अशोक मराठे या शेतकऱ्याला २०,६१६ रुपये मिळवून देण्याची विनंती केली आहे. लुटला गेलेला शेतकरी अशोक मराठे धरणगाव तालुक्यातील आहे. महाराष्ट्र पणन महामंडळाचे संचालक धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील आहेत. हे शेतकऱ्याचे भाग्य आहे की, संजय पवार हे शरद पवार साहेबांचे प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात नियुक्त आहेत आणि पवार साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. तर का मिळू नयेत,लुटलेले २०,६१६ रूपये?, असे देखील शिवराम पाटील यांनी विचारले आहे.
राष्ट्रवादी आणि कांग्रेस पक्ष आंदोलन करीत आहेत.केंद्र सरकारने यंदा कृषीविषयक बील मंजूर केले. त्यात शेतकऱ्यांना नुकसानीचे आहे. पण प्रत्यक्ष आपल्याच सावलीत धरणगाव येथे शेतकऱ्यांचे बळजबरीने आर्थिक शोषण होत असेल तर राष्ट्रवादी आणि कांग्रेसने का चूप बसावे?असा प्रश्न आम्हाला पडला, असेही शिवराम पाटील यांनी म्हटले आहे. शेतकरी एकत्र आले तर उत्तर सापडेलच आणि लढलो तर शेतकरीचा ओरबाडलेला पैसा मिळेलच. जळगाव जिल्ह्यात ना.अनील देशमुख, खा.सुप्रिया सुळे,ना.के.सी पाडवी,ना.यशोमती ठाकूर आलेत आणि गेलेत. पण राष्ट्रवादी आणि कांग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही तक्रार त्यांचेकडे केलीच नाही. मग, मंत्री जळगाव जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांना काय उपयोग? हे असेच चालू द्यायचे का? शेतकऱ्यांचे शोषण,आत्महत्या मान्य आहेत का?, असे अनेक प्रश्न शिवराम पाटील यांनी उपस्थित केले आहेत.