पंढरपूर (वृत्तसंस्था) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अडवलं होतं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.
पंचायत राज समितीचे पथक आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये आमदार अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे व आमदार सदाभाऊ खोत होते. तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीची पाहणी केल्यानंतर सांगोला तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयाकडे हे पथक आले. सर्वप्रथम आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली. गाडीमधून आमदार सदाभाऊ खोत उतरताच मांजरी (ता. सांगोला) येथील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे त्यावेळचे पदाधिकारी असलेले व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले.
हॉटेलचालक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडविल्याने पंचायत समिती परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यात सदाभाऊ खोतांनाही काय बोलावे सुचेना. मात्र, सदाभाऊ खोत यांनी या हाॅटेल मालकाची कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीमध्ये आमदार सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मांजरी या गावचे असलेले अशोक शिनगारे यांचे हॉटेलची उधारी होती. शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी असल्याचे अशोक शिनगारे यांनी आपल्या उधारीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.
सदाभाऊ म्हणतात ‘मी त्यांना ओळखत नाही’
बैठकीनंतर बाहेर आलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत विचारले असता, ‘मी त्यांना ओळखत नाही . तुम्हाला काय माहित असेल तर मला सांगा’ असे म्हणत त्यांनी हा विषय टाळून नेण्याचा प्रयत्न केला.