नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला धनुष्यबाण चिन्हाबाबत लेखी उत्तर सादर केले आहे. त्यानंतर निवडणूक आयोग कार्यालयात तब्बल चार तास हायव्होल्टेज बैठक झाली. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय सोमवारी जाहीर होणार असल्याचे समजते. अंधेरी पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या गटाचा उमेदवार नाही, मग धनुष्यबाण चिन्ह का मागितलं जातंय? असा मुख्य मुद्दा ठाकरेंनी आयोगाकडे उपस्थित केला होता.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदेंच्या गटाचा उमेदवार नाही मग धनुष्यबाण चिन्ह का मागितलं जातंय?
आजच्या सुनावणी संदर्भात निवडणूक आयोगाने शिवसेनेला मध्यरात्री ई-मेल केला होता. शिवसेनेला 2 वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने 800 पानांचे उत्तर निवडणूक आयोगाला सादर केले. हे 800 पानी उत्तर पक्षातील फुटीबाबतची माहिती देणारे होते. त्यानंतर आज शिवसेनेने वकिलांमार्फत निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाबाबत दावा सादर केला. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांना पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आज दुपारी आपली कागदपत्रे दाखल केले. ही कागदपत्रे तपासून निवडणूक आयोग आपला निर्णय देणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत सुनावणीची विनंती केली होती. मात्र जोपर्यंत सर्व कागदपत्रं सादर होत नाहीत, तोपर्यंत सुनावणी करु नये, अशी विनंती ठाकरेंतर्फे करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार नाहीत, मग त्यांना चिन्हाची काय गरज आहे? असा सवाल विचारण्यात आला आहे. केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले, परंतु तात्काळ सुनावणीची गरज नसल्याचे ठाकरेंचे म्हणणे आहे.
चिन्ह गोठवले तर काय? निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्वाची माहिती समोर !
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठावल्यास दोन्ही गटाला उपलब्ध १९७ पैकी एका चिन्हाची निवड करावी लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला हवं असलेलं ढाल, तलवार किंवा वाघ अशा प्रकराचे कोणतंही चिन्ह सदर यादीत नाही. त्यामुळे दोन्ही गट कोणत्या चिन्हाची निवड करतात हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण कागदपत्र सादर केली आहेत. कागदपत्रांचा महत्वाचा तपशीलनुसार विधानसभेतील १४ आमदार विधान परिषदेतील १२ आमदार लोकसभेतील सात खासदार राज्यसभेतील तीन खासदार शिवसेनेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमधील १६० सदस्य, १८ राज्य प्रभारी असल्याचा दावा कागदपत्रात केला आहे. तसेच १९२ जिल्हाप्रमुख, ६०० उपजिल्हाप्रमुख , ७०० तालुकाप्रमुख असल्याचा दावा त्यांनी कागदपत्रात केला आहे.
पुढे काय होणार?
अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतेय. त्यातच पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर आहे. हे पाहता धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेकदा असे प्रसंग उद्भवले असून, त्यावेळी चिन्ह गोठवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले अथवा एखाद्या गटाला चिन्ह दिले, तर पुढे काय, याची तयारीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी करून ठेवल्याचे समजते. ठाकरे गटाकडून सध्या गदा चिन्ह घेण्यावर विचार सुरू आहे. तर शिंदे सेना तलवार हे चिन्ह घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. दसरा मेळाव्यातही एकनाथ शिंदेच्या भाषणापूर्वी एक तलवारही व्यासपीठावर आणण्यात आली होती. ही त्याची तयारी असल्याचे समजते.