मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथराव खडसे यांचे फोन ‘टॅप’ केल्याच्या आरोपाखाली कुलाबा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात हा तिसरा गुन्हा आहे.
पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यानंतर आता मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून 2019मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले, त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला होता. अशाच प्रकारे गुन्ह्याच्या तपासाचे कारण पुढे करून, टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे.