नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीत होणाऱ्या या पत्रकार परिषदेत दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील निवडणूका जाहीर होणार आहेत. विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. महाराष्ट्रात आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता महायुतीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारी 2. 30 मिनिटांनी महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
२७ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कधी आणि किती टप्प्यात मतदान होणार, मतमोजणी होऊन निकाल कधी जाहीर होणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचेही डोळे लागले आहेत. या प्रश्नांची उत्तरं दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मिळणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. मिळालेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान तर, २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते. २६ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकीची घोषणा होऊ शकते.