नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात निदर्शक गडबड करू शकतात, याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांना होती. तरीही पंजाब पोलिसांनी ‘ब्ल्यू बुक’चे पालन केले नाही आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात आकस्मिक मार्ग तयार केला नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या ब्ल्यू बुकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भात दिशा-निर्देश दिले गेले आहेत. ब्ल्यू बुकनुसार कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत राज्य पोलिसांना आकस्मिक मार्ग तयार करावा लागतो. आणि अशीच स्थिती पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात निर्माण झाली होती, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गुप्तचर विभागाचे अधिकारी पंजाब पोलिसांच्या संपर्कात होते. राज्य पोलिसांना निदर्शकांबाबत अलर्ट करण्यात आले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांनी व्हीआयपीच्या पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले होते, असे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले.
PM मोदी सुरक्षेतील चुकीवर पंजाब काँग्रेसमध्ये पडले दोन गट
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पंजाब काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष आणि प्रचार समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पंजाब सरकारमधील मंत्री राणा गुरजीत यांनी आता मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. तर फिरोजपूरचे आमदार परमिंदर पिंकी यांनी यासाठी डीजीपीला जबाबदार धरले. दुसरीकडे, याप्रकरणी भाजप नेते आज राज्यपाल बी. एल. पुरोहित यांची भेट घेणार आहेत. ते पंजाबमधील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी करू शकतात. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच ही मागणी केली आहे.
राष्ट्रपती कोविंद यांनी घेतली सुरक्षेतील त्रुटिंची संपूर्ण माहिती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटर हँडलवरून या बैठकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत लिहिण्यात आले आहे, की “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माहिती घेतली. राष्ट्रपतींनी या गंभीर चुकीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.”
चन्नी सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेतील त्रुटींच्या मुद्द्यावर पंजाबमधील चन्नी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी चन्नी सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल तयार करेल. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या समितीत निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी (७ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पंजाबच्या राज्यपालांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. पंजाब भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडे गृहमंत्री आणि डीजीपी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.