मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भुसावळ आगारातून बोदवड तालुक्यातील विविध गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या बसफेऱ्या कोरोना लॉकडाऊन काळापासून बंद करण्यात आल्या आहेत. त्या बसफेऱ्या पुर्ववत सुरू कराव्यात आणि मुक्ताईनगर आगारअंतर्गत मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या नियमित सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुक्ताईनगर आगारअंतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी बसफेऱ्यांचे नियोजन केले जाते परंतु उन्हाळ्यात लग्नसोहळे आणि इतर प्रासंगिक करारासाठी बसची मागणी जास्त असल्याने आणि शाळा महाविद्यालयांना सुट्या असल्याने ग्रामीण भागातील बहुतांशी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळा महाविद्यालये नियमित सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. गरीब घरातील विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांना ये – जा करण्यासाठी सर्वस्वी बस वर अवलंबून राहावे लागते. ग्रामीण भागातील बसफेऱ्या नियमित सुरू न झाल्याने, विद्यार्थ्यांना प्रसंगी खाजगी प्रवासी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करत शाळा महाविद्यालयात जावे लागते. यात विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असून, पर्यायाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सध्या पेरणीचे दिवस असल्याकारणाने ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना बि-बियाणे व शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच नागरिकांना बाजारहाट, दवाखाना व शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते परंतु बसफेऱ्या बंद असल्याने खाजगी वाहनाने प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. भुसावळ आगारातून कोरोना लॉकडाऊन लागण्यापूर्वी भुसावळ ते बोदवड (सकाळी ११ ते दुपारी १.४० वा.), भुसावळ ते लोणवाडी (संध्याकाळी ७ वा), सोयखेडा (सकाळी ७.३० वा), वाकी (सकाळी ८ वा, दुपारी ४.१० वा), सुरवाडा (दुपारी २.१० वा), विचवा (दुपारी ३.४० वा) अशा बसफेऱ्या नियमित सोडण्यात येत होत्या. त्यामुळे बोदवड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बोदवड, वरणगाव, भुसावळ जाण्यासाठी तसेच नागरिकांना बोदवड, भुसावळ, वरणगाव येथे बाजारहाट, दवाखाना व इतर कामांसाठी ये-जा करणे सोयीचे होत होते.
कोरोना लॉकडाऊन कालावधीपासून या बसफेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रसंगी जादा प्रवास भाडे खर्च करून खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागतो तरी भुसावळ आगारअंतर्गत सोडण्यात येणाऱ्या व कोरोना कालावधीपासून बंद असलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात तसेच मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील बंद असलेल्या बसफेऱ्या नियमित सुरू कराव्यात, त्यासाठी संबंधित भुसावळ व मुक्ताईनगर आगार प्रमुखांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात व बंद असलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या वेळेचे आणि पैशांचे नुकसान टाळून दिलासा द्यावा अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव विजय चौधरी, बोदवड शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, चांगदेव माजी सरपंच अतुल पाटील, प्रदीप साळुंखे आदी उपस्थित होते.