नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणानं शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. आरोपीनं दिवसाढवळ्या पीडित मुलीचा पाठलाग करून तिला ‘मला कॉल कर नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मारेन’ अशी धमकी दिली.
आरोपीच्या या धमकीमुळे घाबरलेल्या पीडित मुलीनं हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी आरोपीला याबाबत जाब विचारला असता, आरोपी पीडित मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली आहे. पीडित मुलीचा विनयभंग आणि त्यानंतर वडिलांना केलेल्या मारहाणीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेतून घरी येत असताना, आरोपीनं तिचा पाठलाग केला होता. आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. रेहान शेख असं आरोपीचं नाव असून आरोपीनं पीडित मुलीला एकांकात गाठून ही धमकी दिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
















