मुंबई (वृत्तसंस्था) भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. टीम इंडियाचा 8 गडी राखून ब्लॅककॅपने पराभव केला. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पराभवाचं कारण सांगितलं आहे. पावसामुळे आम्हाला लय मिळणं मुश्किल झालं, त्यात बॅट्समनकडून म्हणावी अशी कामगिरी झाली नसल्याचं विराट म्हणाला.
“न्यूझीलंड टीम विजयाची हकदार आहे. अंतिम सामन्यात त्यांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन घडवलं. पावसामुळे भारतीय संघाला लय मिळणं मुश्किल झालं होतं. पावसामुळे आम्ही डिस्टर्ब झालो. पावसाने खराब झालेली लय संघाला परत मिळवणं मुश्किल होऊन बसलं”, असं विराट कोहली म्हणाला. “पावसाने पहिल्या दिवशीचा खेळ वाया गेला आणि खेळ सुरु झाला तर लय पकडणं आम्हाला मुश्किल होऊन बसलं. आम्ही केवळ तीन विकेट गमावल्या पण खेळ जर विनाव्यत्यय सुरु राहिला असता तर आम्ही विकेट न गमावता अधिक रन्स करु शकलो असतो”, असंही विराट म्हणाला.
“न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी शुभेच्छा. तीन ते सव्वा तीन दिवसांत त्यांनी सामना जिंकून दाखवला. त्यांनी भारतीय संघाला दबावात ठेवलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्लॅननुसार गोलंदाजी केली आणि सामना जिंकवून दाखवला. ते जिंकण्याचे नक्कीच हकदार आहेत”, अशा शब्दात न्यूझीलंड संघाची स्तुतीही विराटने केली.