नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्या अटकेच्या मागणीचा बुधवारी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. तसेच केंद्र सरकार अदानींना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.
अदानी हजारो कोटींच्या अनियमिततेप्रकरणी आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे, असे राहुल म्हणाले. अदानी समूहाने गौतम अदानी व त्यांचे पुतणे सागर अदानींवरील लाचखोरीचे आरोप फेटाळले आहेत. अदानी कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा कोणताही आरोप नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
याबाबत विचारले असता राहुल यांनी अदानी समूहाच्या खुलाशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी आपल्यावरील आरोप मान्य करतील, असे तुम्हाला वाटते का? तुम्ही कोणत्या जगात आहात ? निश्चितपणे ते आरोप नाकारणारच. त्यामुळे अदानींना अटक करावी, ही आमची मागणी आहे, असा मुद्दा राहुल यांनी मांडला. छोट्या-छोट्या प्रकरणांमध्ये शेकडो लोकांना अटक केली जाते. मात्र, या महाशयांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असूनही ते मोकाट आहेत. यांना तुरुंगात डांबले पाहिजे. परंतु, सरकार त्यांना वाचवत आहे, असे राहुल म्हणाले.