खंडाळा (वृत्तसंस्था) पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर पारगाव- खंडाळा येथील बस स्थानकासमोर दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात असलेल्या दांपत्याला चार चाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकी उड्डाणपुलावरून ३५ फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळली. यामध्ये दुचाकीवरील उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, उन्नती उपेंद्र चाटे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शनिवार दि. ०७ रोजी उपेंद्र चाटे हे आपल्या पत्नी समवेत दुचाकीवरून पुण्याहून कोल्हापूरला गणपतीसाठी निघाले होते. प्रवासादरम्यान ते पारगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या बस स्थानका समोरील पुलावरून जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना हुलकावणी दिल्यामुळे दुचाकीवरील चाटे दांम्पत्य पस्तीस फुट खाली सर्व्हिस रस्त्यावर पडले. तर त्यांची दुचाकी महामार्गावरच अडकुन राहिली. यामध्ये उपेंद्र चाटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी उन्नती चाटे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना साताऱ्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.