जळगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी मुलगी सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिच्या सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त बीड येथे गेलेल्या कलंत्री कुटुंबीयांचे बंद घर चोरट्यांनी फोडून सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण सहा लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना दत्त कॉलनीमध्ये उघडकीस आली. (Jalgaon Crime News)
चार्टर्ड अकाऊंटंट राजेश कलंत्री दत्त कॉलनीमध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी मुलगी नेहा ही सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिचा सत्काराचा कार्यक्रम हा कलंत्री यांच्या बीड येथील सासूरवाडीत आयोजित केला होता. त्यानुसार घराला कुलूप लावून कलंत्री कुटुंबीय गुरुवारी सकाळी बीडसाठी रवाना झाले होते. कुलूपबंद घर पाहून मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घरकाम करणारी महिला कामावर आल्यावर तिला घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आला.
महिलेने लागलीच कलंत्री यांचे मावसभाऊ स्वप्निल लाठी यांना घरात चोरी झाल्याची माहिती दिली. चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रुपये रोख, 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये किमतीचे चांदीचे भांडे व कॉईन आणि 1 लाख रुपये किमतीचा हिरामोती (डायमंड) आणि अंगठी असा मुद्देमाल लंपास केला आहे. पुढील तपास हे.कॉ. शरीफ रहीम शेख करत आहेत.