सावदा (प्रतिनिधी) मालमत्ता खरेदीत शासनाची ६५ हजारांत फसवणूक केल्याप्रकरणी फैजपूरच्या माजी नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी यांच्यासह सात जणांवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
फैजपूर येथील युवराज सुदाम तळेले हे फैजपूर विविध कार्यकारी सोसायटीचे थकबाकीदार आहेत. त्यांच्या मालकीच्या दोन मालमत्ता सोसायटीने जप्त केल्या होत्या. भागवत पाटील यांनी या मालमत्ता बखळ असल्याचे भासवून सुमाई ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन अनिल विनायक पाटील यांना लिलाव केला. बांधकाम असताना या दोन मालमत्ता बखळ असल्याचे दाखविण्यात आले. या दरम्यान, जितेंद्र पवार यांचे निधन झाले. ही जागा त्यांचे वारस कविता व युगंधर पवार (रा. सावदा) यांच्या नावे झाली. हीच मालमत्ता पुढे अमिता चौधरी व नितीन पाटील यांनी जानेवारी २०२२ मध्ये खरेदी केली आणि यात शासनाचा जवळपास ६८ हजाराचा महसूल बुडाला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच दुय्यम निबंधक प्रशांत कुलकर्णी यांनी पोलिसात तक्रार दिली.
यांच्या विरुद्ध दाखल झालाय गुन्हा
अमिता चौधरी यांच्यासह फैजपूर येथील विशेष वसुली अधिकारी भागवत लक्ष्मण पाटील, सुमाई पतसंस्थेचे चेअरमन अनिल विनायक पाटील, जितेंद्र प्रकाश पवार (मयत), कविता जितेंद्र पवार, युगंधर जितेंद्र पवार (रा. सावदा) आणि नितीन चंद्रकांत पाटील (फैजपूर) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुढील तपास सहायक फौजदार अन्वर तडवी हे करीत आहेत.