औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेला (Aurangabad Rally) पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडे आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६ ११७, १५३ अ आणि मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद पोलिसांनी सभेला परवानगी देताना ज्या अटी-शर्थी घातल्या होत्या त्यांचं उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
थोड्याच वेळापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात दुपारी एक बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
काय म्हणाले होते पोलीस महासंचालक?
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तानी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील.
आवश्यक वाटल्यास राज ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.