जळगाव (प्रतिनिधी) बनावट कागदपत्राद्वारे पिंप्राळा शिवारात एक हेक्टर ६९ आर भूखंडाची खरेदी व विक्री केल्याप्रकरणी माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे तक्रार
अशोक नामदेव राणे (वय ६३, रा. भोईटे नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक ३३८/१ क्षेत्र ६६ आर व गट क्रमांक ३३९ अ क्षेत्र ९५ आर एकूण १ हेक्टर ६९ आर भूखंडाची विक्री झाली आहे. या जमिनीची किंमत ५ ते ६ कोटी रुपये असून १३ मार्च ते १९ जुलै २०१३ या कालावधीत बनावट कागदपत्र तयार करून सह धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयात सादर केले हा भूखंड विक्री करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या हिताचे आदेश पारित करून धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा
अजगर अजिज पटेल (रा.भादली बुद्रुक, ता.जळगाव), गुरुमुख मेरुमल जगवाणी, हरीष ए. मतवाणी, नीलेश विष्णू भंगाळे, विठ्ठल गलाजी सोळुंके, मीना विठ्ठल सोळुंके व एच.ए.लोकचंदाणी ( सर्व.रा.जळगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.